तुमसर शहरात पावसाळापूर्व नाली सफाई मोहिमेला युद्धपातळीवर प्रारंभ
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी साचणे, दुर्गंधी सुटणे आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी नगर परिषद तुमसरच्या आरोग्य विभागामार्फत पावसाळापूर्व नाली सफाई मोहिमेला धडाक्यात सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळ्यात शहरातील सखल भागात पाणी साचू नये आणि पाण्याचा निचरा वेळेत व्हावा, या उद्देशाने नगर परिषदेने आधीच कंबर कसली आहे. सध्या शहरातील प्रमुख रस्ते, चौक तसेच विविध प्रभागांतील छोट्या-मोठ्या नाल्यांची स्वच्छता करून त्यातील गाळ व कचरा काढण्याचे कामयुद्धपातळीवर सुरू आहे. या मोहिमेमुळे पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्यास मोठी मदत होणार असून, नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास हातभार लागणार आहे. नगर परिषद तुमसरचे उपाध्यक्ष सचिन बोपचे यांनी स्वतः प्रभागांमध्ये जाऊन सुरू असलेल्या नाली सफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी त्यांनी कामाच्या गतीचा आढावा घेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. “शहरातील एकाही भागात पावसाचे पाणी तुंबणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व नाल्यांची स्वच्छता शंभर टक्के पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.’ असा विश्वास बोपचे यांनी यावेळी व्यक्त केला. नगर परिषद आपले कर्तव्य चोख बजावत असली, तरी शहराची स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातला कचरा, प्लास्टिक किंवा इतर टाकाऊ वस्तू नाल्यांमध्ये टाकू नयेत. आपले प्रभाग आणि परिसर स्वच्छ ठेवून नगर परिषदेच्या या मोहिमेला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद तुमसरच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.









