जुनी पिंपरी, चिंचोली येथे वादळी वाऱ्याचा हाहाकार
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जवाहरनगरपासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जुनी पिंपरी, चिंचोली गावात आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आलेल्या अचानक वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान केले. अवघ्या काही मिनिटांत घोंगावत आलेल्या वादळामुळे अनेक घरांची पत्र्याची छते उडून गेली, तर दोन जनावरे मृत्युमुखी पडली. शेकडो झाडे व विद्युत पोल उन्मळून पडल्याने संपूर्ण गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे जुनी पिंपरी, चिंचोली व परीसरात हाहाकार माजला आहे. रात्रभर नागरीकांना अंधारात राहावे लागणार आहे,
हे विशेष. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी १.३० वाजता आकाश अचानक काळेकुट्ट झाले आणि सोसाट्याचा वारा सुटला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक ६० घरांवरील टिनपत्रे व सिमेंटचे पत्रे कागदासारखे उडून दूरवर फेकले गेले. गावातील १२ ते १५ कुटुंबांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. छत उडाल्याने घरातील धान्य, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचेही नुकसान झाले असून, अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. वादळात झाड कोसळून गोठ्यातील दोन बैल जागीच ठार झाले. यामुळे कुटुंबावर मोठा आर्थिक आघात झाला आहे. वादळामुळे आंबा व इतर फळझाडे मोठ्या प्रमाणातउन्मळून पडली.
शेतातील उभ्या पिकांचेही नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतला आहे. घटनेची माहिती मिळताच तहसील कार्यालयाचे पथक व तलाठी घटनास्थळी दाखल झाले. नुकसानग्रस्त कुटुंबांची व शेतीची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दरम्यान, हवामान खात्याने पुढील २४ तासांत जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.









