घरफोडी करणाऱ्या दोन आरोपिंना सहा तोळे सोन्यासह अटक
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर तालुक्यात तीन ठिकाणी घरफोडी करून दागिने चोरणाऱ्या दोन आरोपींना गोबरवाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून सहा तोळे सोने हस्तगत करण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी अभिषेक उर्फ चांडरी याला ताब्यात घेतले. त्याची कसून चैकशी केली असता आणि त्याच्या मोबाईलमधील फोटोंची पाहणी केली असता, तो विधान पटले नावाच्याव्यक्तीसोबत काम करत असल्याचे निष्पन्न झाले.
यावरून पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन विधान पटले यालाही पोलीस ठाण्यात आणले. दोन्ही आरोपींची सखोल चैकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची सविस्तर माहिती दिली. आरोपी अभिषेक उर्फ चांडरी याने कबुली दिली की, दिनांक २० मे २०२६ रोजी दुपारी त्याने चोरी करून मुद्देमाल स्वतःच्या घरी लपवून ठेवलाहोता. त्याच रात्री दहा वाजता त्याने विधान पटले याला आपण माल चोरल्याचे सांगितले आणि तो विकून येणारे पैसे अर्धेअर्धे वाटून घेण्याचे ठरवले. त्यानंतर दिनांक २१ मे २०२६ रोजी दोन्ही आरोपींनी मध्यप्रदेशातील बोनकंटा येथे जाऊन एका मित्राच्या नावावर तेथील एका सोनाराकडे काही सोने गहाण ठेवले व त्या बदल्यात पैसे घेतले. तसेच, उर्वरित अंदाजे पाच तोळे सोने त्यांनी आरोपी विधान पटले याच्या घरी लपवून ठेवले होते.
गोबरवाही पोलिसांनी बोनकंटा (मध्य प्रदेश) आणि विधान पटले याचे घर अशा दोन्ही ठिकाणांहून चोरीला गेलेले संपूर्ण ६ तोळे सोने यशस्वीरीत्या हस्तगत केले आहे. या व्यतिरिक्त, सदर आरोपींची अधिक चैकशी केली असता त्यांनी जिल्ह्यातील इतर दोन घरफोडीचे गुन्हे केल्याचीही कबुली दिली. यामध्ये गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गतच दाखल असलेला आणखी एक घरफोडीचा गुन्हा आणि सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत एप्रिल २०२६ मध्ये घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा समावेश आहे.









