अनैतिक संबंधांच्या संशयातून पतीचा गळा दाबून खून;कुडवा येथील थरारक घटना

दै.लोकजन वृत्तसेवा गोंदिया :-शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुडवा परिसरात कौटुंबिक कलह आणि संशयाच्या धगधगत्या ज्वाळेतून एका विवाहित पुरुषाचा गळा दाबून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला अटक केली असून, संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नातेसंबंधातील विश्वासघात, संशय आणि वैवाहिक तणाव यांचे भयावह रूप या घटनेतून समोर आले आहे. मृताचे नाव राजेंद्र उर्फ राजेश कात्रे (४४) असे असून ते गेल्या अनेक वर्षांपासून कुडवा गावात वास्तव्यास होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेश कात्रे यांना दोन पत्नी होत्या.पहिल्या पत्नीची मानसिक स्थिती ठीक नसल्याने ती माहेरी राहत होती.त्यामुळे राजेश हे दुसरी पत्नी अनिता राजेश कात्रे हिच्यासोबत राहत होते.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून पतीपत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे. मंगळवार, २६ मेच्या रात्री घराच्या मालकीच्या कागदपत्रांवरून तसेच पत्नीच्या कथित अनैतिक संबंधांवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात पत्नीने पतीला मारहाण करून त्याचा गळा दाबल्याचा आरोप आहे.या कृत्यात तिचा कथित प्रियकर संजय लिल्हारे यानेही साथ दिल्याचे तपासात समोर आले आहे. घटनेनंतर हा मृत्यू अपघाती असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दुसऱ्या दिवशी मृताची बहीण नर्मदा दिनेश पांढरे यांना घटनेची माहिती मिळाली. त्या घरी पोहोचल्या असता भावाच्या शरीरावर मारहाणीच्या स्पष्ट खुणादिसून आल्या.

विशेषतः मानेवर बोटांचे ठसे आणि जखमांचे निशाण पाहून त्यांचा संशय बळावला. त्यांनी तत्काळ रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर रामनगर पोलीस ठाणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक चौकशी, पंचनामा आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी आरोपी पत्नी अनिता कात्रे आणि तिचा प्रियकर संजय लिलहारे यांना ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. मृतदेहाचे शवविच्छेदन शासकीय जिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून, त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी तक्रारदार नर्मदा दिनेश पांढरे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे कुडवा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक नात्यांमधील वाढता अविश्वास आणि संशय किती भीषण परिणाम घडवू शकतो, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *