भंडारा बायपासवरील पलाडी अंडरपास ब्रिज करीता २० कोटींचा निधी मंजूर
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा शहर बायपास मार्गावरील पलाडी गावाजवळ नागरिकांना वाहतुकीत होत असलेल्या गैरसोयीबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) जिल्हा भंडारा या समितीने माजी खासदार सुनिल मेंढे यांचे कडे निवेदन सादर केले होते. श्री. मेंढे यांनी सदर विषयाला अनुसरून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांच्या कडे सदर कामाकरिता सातत्याने पाठपुरावा केला. भंडारा बायपास मार्ग हा कोका अभयारण्याकडे जाणारा प्रमुख मार्ग असून परिसरात आर टी ओ कार्यालय, ईव्हिएम स्ट्राँग रुम, वैद्यकीयमहाविद्यालय, तसेच पलाडी गाव वसलेले आहे.
मात्र या मार्गावर पलाडी गावाकडे जाण्यासाठी योग्य व सुरक्षित वळणाची व्यवस्था नसल्यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनचालकांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांना जवळपास दीड किलोमीटर पुढे जाऊन परत फिरावे लागत असल्याने वेळेचा अपव्यय तसेच अपघाताचा धोका वाढला होता. या समस्येची गंभीर दखल घेत माजी खासदार सुनील मेंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सविस्तर निवेदन दिलेहोते. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत या कामासाठी तब्बल २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीतून पलाडी गावाजवळ आवश्यक अंडरपास, जोडरस्ता तसेच इतर कायमस्वरूपी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक व्यवस्थाही अधिक सुरक्षित आणि सुकर होणार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. नागरिकांनी या निर्णयाबद्दल माजी खासदार सुनील मेंढे यांचे आभार व्यक्त केले आहेत.









