पालोरा येथे जुगार अड्डयावर धाड
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मौजा पालोरा येथे पडक्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर करडी पोलिसांनी छापा टाकून चौघांना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल व दुचाकीसह एकूण ८२ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. २६ मे रोजी दुपारी दरम्यान पोलीस उपनिरीक्षक हनुमंत फरताडे हे अंमलदार समीर मेश्राम, द्वारकेश्वर मुळे, सुरज थोडेसे यांच्यासह पालोरा येथे पेट्रोलिंग करत होते. तेव्हा त्यांना जितेंद्र कोडापे यांच्या पडक्या घरात काही इसम ५२ तासपत्तीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. लगेच त्यांनी घटनास्थळी धाड टाकली.
यावेळी त्यांनी नितीन रतनलाल मेश्राम (वय ४०), चंद्रमनी अशोक खोब्रागडे (वय ३६),प्रगत प्रमोद तिरपुडे (वय ३८) व सरविंद प्रेमलाल कडाम (वय ३९) सर्व रा. पालोरा यांना ताब्यात घेतले. आरोपींच्या अंगझडतीतून व घटनास्थळावरून रोख २ हजार ६७० रुपये, रेडमी व रिअलमी कंपनीचे प्रत्येकी १०हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, ६० हजार रुपये किमतीची हिरो पॅशन एक्सप्रो मोटारसायकल क्र. एम.एच.-३६/यु-३२१०, ५२ तासपत्ती व नावांखाली पॉईंट लिहिलेला कागद असा एकूण ८२ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पो.उप.नि. हनुमंत फरताडे यांच्या फिर्यादीवरून करडी पोलीस ठाण्यात कलम ४, ५ म.जु.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फरताडे करीत आहेत.









