एस.टी. डेपो मागील वनराईत तात्काळ स्वच्छता करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- प्रभाग क्रमांक १०, साई मंदिर मागील परिसराला लागून असलेल्या महाराष्ट्र एस. टी. डेपोच्या मागील वनराई क्षेत्रात प्रचंड घाण, झाडी-झुडपे व कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. त्यामुळे विषारी साप व इतर प्राण्यांचा त्रास वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

तातडीने या परिसराची स्वच्छता करण्यात यावी या मागणीचे निवेदन प्रभाग १० च्या नगरसेविका प्रिती अविनाश ब्राम्हणकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भंडाराचे विभाग नियंत्रक बेलसरे यांना देण्यात आले. प्रभाग १० मधील साईमंदिर मागील भागाला एस.टी. डेपोची उंच भिंत लागून आहे. भिंतीच्या बाजूने दाट लोकवस्ती आहे. डेपोच्या मागील परिसरात दाट झाडे-झुडपे, कचऱ्याचे साम्राज्य व मोठमोठी झाडे वाढली आहेत. ही झाडे थेट नागरिकांच्या घरापर्यंत डोकावत आहेत. त्यामुळे भिंतीला लागून असलेल्या घरांमध्ये विषारी साप तसेच इतर विषारी प्राणी शिरत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार, डेपो मागील परिसराचे मेंटेनन्स होत नसल्यामुळे मागील महिन्यात या भागात मोठ्या प्रमाणात आग लागली होती. ही आग लोकांच्या घरापर्यंत पसरली होती. वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, फायर ब्रिगेड व इतर साधनांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी प्रचंड दमछाकसहन करावी लागली, कारण तिथे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही.

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत नागरिकांनी आगार व्यवस्थापक, महाराष्ट्र एस.टी. डेपो, भंडारा यांना निवेदन दिले आहे. डेपो मागील जागा तातडीने स्वच्छ करून जेसीबी व फायर ब्रिगेडसारख्या वाहनांना येण्याजाण्यास मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता न झाल्यास सापांचा धोका व रोगराई वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. यावेळी नगरसेविका प्रिती अविनाश ब्राम्हणकर, प्रभागातील श्वेता खापेकर, सचिन खापेकर, शहबाज खान, मोहनीश बावनकुळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *