जीव वाचवणारे डॉक्टर बनले नागरिकांच्या सुरक्षेचे “हिरो’

डॉ. गोपाल व्यास यांच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- रुग्णांचे प्राण वाचवणारे डॉक्टर जेव्हा नागरिकांच्या सुरक्षेसाठी धावून येतात, तेव्हा ते खऱ्या अर्थाने “हिरो’ ठरतात. अशीच एक प्रेरणादायी घटना प्रभाग क्रमांक १० मध्ये घडली. भंडारा येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ, लक्ष हॉस्पिटलचे संचालक डॉ. गोपाल व्यास यांच्या घरासमोर अचानक एका चारचाकी वाहनाला भीषण आग लागली असता, त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे मोठी जीवितहानी टळली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास डॉ. व्यास यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि मोठे ज्वाळे उसळू लागले.

गाडीच्या टाकीचा स्फोट होऊन परिसरात मोठी हानी होण्याची भीती निर्माण झाली होती. नागरिकांमध्ये घबराट पसरली असताना, डॉ. व्यास यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. फायर ब्रिगेडची वाट न पाहता त्यांनी घरातील पाण्याच्या पाईपलाईनद्वारे आगीवर पाणी मारण्यास सुरुवात केली. आग इतकी भयानक होती की गाडी जवळपास ८० टक्के जळून गेली होती. तरीही त्यांनी धैर्य न हरवता प्रयत्न सुरूच ठेवले. त्यानंतर दवाखान्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने फायर एक्स्टिंग्विशरचा वापर करून आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. “डॉक्टर रुग्णालयात ऑपरेशन करून जीव वाचवतात, पण आज डॉ. व्यास यांनी रस्त्यावर सुरक्षेचे यशस्वी ऑपरेशन करून आमचे प्राण वाचवले.’ अशा भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *