देव्हाडी उड्डाण पुलावर ट्रॅव्हल्सची ट्रॅक्टरला जोरदार धडक

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी येथील उड्डाण पुलाच्या वळणावर रविवारी भीषण अपघात घडला. गोंदियाच्या दिशेने धावणाऱ्या एमएच १७ सीवाय ९९९६ क्रमांकाच्या खासगी ट्रॅव्हल्सने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरच्या दिशेने जात असलेल्या एमएच ३६ एएल २०४६ क्रमांकाच्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात तुडका येथील ट्रॅक्टर चालक शेतकरी शेखर गोयनू मानापुरे आणि त्यांची पत्नी प्रतीक्षा मानापुरे गंभीर जखमी झाले.

धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रॅक्टरची ट्रॉली तुटून रस्त्यावर पडली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ प्रभावित झाली होती. दरम्यान, ट्रॅव्हल्समधील प्रवासी थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमी मानापुरे दाम्पत्यांना उपचारासाठी तुमसर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रतीक्षा मानापुरे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणाची नोंद तुमसर पोलिसांनी घेतली असून संबंधित ट्रॅव्हल्ससह चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *