“नवतपा’ ने अग्निचा तडाखा मान्सूनपूर्व निसर्गाचा तापलेला श्वास

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- मे महिन्याच्या अखेरीस विदर्भातील आकाश अक्षरशः अग्निच्या तडाख्याने धगधगत असतानाच सोमवारपासून “नवतपा’ ला सुरुवात झाली आहे. आधीच गेल्या पंधरा दिवसांपासून उष्णतेच्या प्रखर लाटा नागरिकांना हैराण करत असताना आता पुढील नऊ दिवस अधिकच कडक जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूर्याच्या तळपत्या किरणांनी धरती भाजून निघत असताना विदर्भातील जनजीवनावर उकाड्याचे सावट गडद होत चालले आहे.

काय असतो “नवतपा’?

भारतीय पारंपरिक हवामानशास्त्रात ज्येष्ठ महिन्यातील सलग नऊ दिवसांच्या कालावधीला “नवतपा’ असे म्हटले जाते. याच काळात सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि सूर्यकिरणांचा प्रभाव अधिक तीव्र होतो. परिणामी तापमानात मोठी वाढ होते. हवामान अभ्यासकांच्या मते, हा कालावधी वर्षातील सर्वाधिक उष्ण टप्प्यांपैकी एक मानला जातो. उष्ण वारे, प्रखर उन्हे आणि वाढलेला उकाडा यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असते. यंदा २५ मे ते २ जून या कालावधीत नवतपा राहणार असून, विदर्भातील तापमान ४६ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दुपारच्या वेळेत रस्ते निर्मनुष्य होणे, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आणि पाण्याच्या मागणीत वाढ असे चित्र या काळात दिसून येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *