करडी येथील पाणी टंचाई विरोधातील उपोषणाची सांगता
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- गेल्या तीन दिवसांपासून पाणीटंचाईच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाची अखेर आज दि. २१ रोजी सांगता झाली. आ. राजुभाऊ कारेमोरे यांच्या सूचनेनुसार जि.प. सदस्य महादेव पचघरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते ग्रा. पं. सदस्य धम्मदीप कोटांगले यांच्याशी चर्चा केली. चर्चेदरम्यान नवीन पाईपलाईन टाकून लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. तसेच जि. प. भंडारा पाणीपुरवठा अधिकारी खोब्रागडे यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्रही उपोषणकर्त्यांना देण्यात आले.
सदर काम तातडीने पूर्ण करूनगावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. जि.प. सदस्य महादेव पचघरे व पाणीपुरवठा अधिकारी खोब्रागडे यांच्या हस्ते उपोषणकर्ते धम्मदीप कोटांगले यांना लिंबूपाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. आ. राजुभाऊ कारेमोरे यांनी पाणीपुरवठा अधिकारी खोब्रागडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. “कामात काही अडचण आल्यास मी स्वतः मदत करेन,’ असा शब्दही त्यांनी दिला. यावेळी पं. स. सदस्य प्रीती शेंडे, सरपंच नीलिमा इलमे, पाणीपुरवठा अभियंता हिमांशू बांते, चंदु सेलोकर, भाऊंदास साठवणे, मुकेश आगाशे, याकूब बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.









