मुकुंद साखरकर भंडारा जिल्हा काँग्रेस नवे अध्यक्ष
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी युवा व अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेले मुकुंद विनोद साखरकर यांची निवड झाल्याने जिल्ह्यातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुकूंद साखरकर हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आ. नाना पटोले यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. तसेच खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्याशीही त्यांचे जवळचे संबंध आहेत.
विद्यार्थी दशेपासूनच काँग्रेस विचारांशी जोडले गेलेले साखरकर यांनी तालुका व जिल्हा पातळीवर अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. शेतकरी, बेरोजगार तरुण व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. काँग्रेसचे जिल्हा महासचिव होते. पक्षाने युवा नेतृत्वावर विश्वास दाखवत मुकुंद साखरकर यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्याने काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली असून पक्षात चैतन्याचे वातावरण आहे.









