अकरावी प्रवेशाचा खेळखंडोबा!

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा : राज्यभरात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी भंडारा जिल्ह्यात प्रवेश प्रक्रियेचा “खेळखंडोबा’ झाल्याचे चित्र दिसून आले. अकरावी प्रवेशासाठीची अधिकृत वेबसाईट सकाळपासूनच ठप्प् झाली. सर्व्हर डाऊन झाल्याने व वेबसाईट क्रॅश झाल्याने हजारो विद्यार्थी व पालकांचा मोठा गोंधळ उडाला. तासंतास प्रयत्न करूनही लॉगिन न होणे, अर्ज भरता न येणे, ओटीपी न येणे अशा तांत्रिक अडचणीमुंळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले.

दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदावर शिक्षण विभागाच्या भोंगळ नियोजनाने अक्षरशः पाणी फेरले. राज्यभर बुधवार, २१ मे पासून सुरू झालेल्या अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी वेबसाईट काही वेळातच बंद पडल्याने भंडारा जिल्ह्यात प्रचंड गोंधळ उडाला. सायबर कॅफे आणि महा-ई-सेवा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या, तर सर्व्हर क्रॅशमुळे अर्ज अर्धवट राहत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, २६ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार असून २७ मे पासून प्रवेशाच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. मात्र सध्याच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, १९ मेसकाळी ११ वाजेपासून ते २० मे सायंकाळपर्यंत शिक्षण विभागाकडून सराव सत्र (प्रॅक्टिस सेशन) घेण्यात आले होते. त्यामुळे यंदा वेबसाईट सुरळीत चालेल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना आणि पालकांना होती. मात्र प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर कोलमडल्याने शिक्षण विभागाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मागील वर्षीदेखील अशाच प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतरही प्रशासनाने कोणताही धडा घेतला नसल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *