मुख्याध्यापक मुदलियार यांच्या नेतृत्वात जि. प. हायस्कूल पालोराची घोडदौड
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- जिल्हा परिषद हायस्कूल, पालोरा या ग्रामीण भागातील शाळेने गेल्या दोन वर्षांत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. दोन वर्षांपूर्वी मुख्याध्यापक म्हणून महेश मुदलियार रुजू झाल्यापासून शाळेचे चित्रच पालटले आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजन व शिस्तबद्ध कारभारामुळे दहावी, बारावी सह सर्वच परीक्षांमध्ये शाळेचा निकाल सातत्याने उंचावत आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा परिणाम म्हणून मागील वर्षी बारावीच्या परीक्षेत तर यावर्षी दहावीच्या परीक्षेत पालोरा शाळेचे विद्यार्थी मोहाडीतालुक्यातून प्रथम आले. तसेच पुणे द्वारा झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत ११ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. नियमित तासिका, सराव चाचण्या, शंका निरसन वर्ग व विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगतीकडे लक्ष देण्याच्या मुख्याध्यापकांच्याकार्यपद्धतीमुळे हे यश शक्य झाले आहे. “मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळालेच पाहिजे’ या ध्येयाने मुदलियार स्वतः लक्ष घालून प्रयत्न करीत आहेत. शिक्षकांवर देखरेख, पालकांशी संवाद व विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम ते सातत्याने करतात. यामुळेच पालकांचा शाळेवरील विश्वास वाढला असून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची शाळाही खासगी शाळांना मागे टाकू शकते. हे पालोरा हायस्कूलने दाखवून दिले आहे.









