वैनगंगेच्या लाटांनी गिळले दोन तरुण जीव
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडीः- बेटाळा गावाजवळील वैनगंगा नदीने शनिवारी दोन तरुणांना आपल्या कवेत घेतल्याने संपूर्ण परिसरावर दुःखाचे सावट पसरले आहे. बुडालेल्या एका मित्राचा शोध घेण्यासाठी जीवाची पर्वा न करता नदीत उतरलेल्या दुसऱ्या युवकालाही जलसमाधी मिळाल्याने ही घटना अधिक हृदयद्रावक ठरली आहे. एका युवकाचा मृतदेह रविवारी सकाळी सापडला असून दुसऱ्या युवकाचा शोध घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अखेर त्याचा मृतदेह २४ तासानंतर सायंकाळी ५.३० वाजता पाण्याच्या वर आला. या दुर्दैवी घटनेमुळे बेटाळा गावावर शोककळा पसरली असून प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू दाटले आहेत.
शनिवारी सायंकाळी सुमारेपाच वाजताच्या सुमारास बेटाळा येथील नैतिक ठवकर हा युवक वैनगंगा नदीत पोहण्यासाठी गेला होता. नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात बुडाला. ही बातमी कळताच त्याचा शोध घेण्यासाठी पट्टीचा पोहणारा धाडसी युवक जितेंद्र भुरे क्षणाचाही विलंब न लावता नदीत उतरला. मात्र नियतीने त्यालाही सोडले नाही आणि दुसऱ्याचा पत्ता लावण्यासाठी गेलेल्या जितेंद्रला देखील वैनगंगेच्या पाण्याच्या अथांग खोल गर्तेने त्यालाही आपल्या कवेत घेतले. अंधार पडल्याने शनिवारी रात्री शोधमोहीम थांबवावी लागली. मात्र गावकऱ्यांच्या मनातील आशेचा किरण कायम होता.
रविवारी सकाळी भंडारा येथून एनडीआरएफची टीम मोटारबोटसह घटनास्थळी दाखलहोण्यापूर्वी सकाळी सुमारे सात वाजेच्या दरम्यान नैतिक ठवकर याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्याला लगेच मोहाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर त्याच्यावर बेटाळा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेदरम्यान संपूर्ण गाव दुःखाने हेलावून गेले होते. दरम्यान, जितेंद्र भुरे याचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची टीम, स्थानिक मच्छीमार युवक आणि प्रशासन नदीपात्रात सायंकाळपर्यंत सर्थीचे प्रयत्न करत होते.
जाळी टाकून, गळ टाकुन, बोटीद्वारे आणि विविध ठिकाणी तपासणी करून शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली. मात्र सायंकाळपर्यंत त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नव्हता. अखेर २४ तासानंतर नैसर्गिक पद्धतीने त्याचा मृतदेह पाण्याच्या वर आला. घटनास्थळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी जगदीश कुंभारे, ग्राम महसूल अधिकारी विकास कदम तसेच मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दिवसभर उपस्थित राहून शोधकार्यावर लक्ष ठेवून होते. एका मित्राला पाण्यात शोधण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या जितेंद्रच्या धाडसाने आणि दोन उमलत्या जीवांच्या अकाली अंताने बेटाळा गाव सुन्न झाले आहे. घराघरांत हळहळ व्यक्त होत असून गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटरने दोन कुटुंबांचे आनंद हिरावून घेतल्याची वेदना प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजली आहे.









