काँग्रेसचे कारधा वैनगंगा नदीवर जलसमाधी आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः-भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या, धानाचे अडलेले पैसे, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या यासह इतर मागण्यांसाठी आज भंडारा व गोंदिया जिल्हा काँग्रेसच्यावतीने कारधा येथील वैनगंगा नदीवर जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होते. आपत्ती विभागाची चमू नदीच्या पात्रात बोटी व तैराकी चमूसह सज्ज होती.
जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, सिंचन प्रकल्प रखडले आहेत, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, गावोगावी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न गंभीर आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाच्या उदासीनतेचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात एम.डी., गांजा व इतर अमली पदार्थांची वाढती तस्करी आणि त्यामध्ये अडकत चाललेली युवकांची पिढी ही अत्यंत चिंतेची बाब आहे. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे.
केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना करण्याचे आश्वासन देवूनही आता ओबीसींची कॉलम ठेवण्यात आला नाही. मात्र याकडे शासन आणि संबंधित यंत्रणा गांभीर्याने लक्ष देण्यासाठी हे जलसमाधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या वेळी आयोजित सभेत आ. नानापटोले, खा. प्रशांत पडोळे, गडचिरोली-चिमुर क्षेत्राचे खासदार नामदेवराव किरसान, भंडारा जिल्हा काँग्रेसच कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. जयश्री बोरकर, माजी खासदार शिशुपाल पटले, जि. प. अध्यक्ष कविता उईके, माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे, यांच्यासह इतरांनी आपल्या भाषणातून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यावर ताषेरे ओढळले. त्यांनी आपल्या भाषणातून केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकरी, सर्वसामान्य जनता, ओबीसी, महिला यांच्यावर कशाप्रकारे अन्याय करीत आहेत, हे सांगितले.
ओबीसीचा कॉलम नसल्याने आपल्या दारावर कुणी जनगणनेसाठी आला तर त्याला परत पाठवा. जोपर्यंत आमचा ओबीसीचा कॉलम समाविष्ट होणार नाही, तोपर्यंत जनगणनेत सहभाग घेणार नाही, असे स्पष्ट सांगात. नीट ची परिक्षा रद्द करून सत्तावीस लाख विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला. महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. सर्वसामान्य जनतेवर अन्याय, अत्याचारवाढला आहे. यामुळे भविष्यात काँग्रेसची सत्ता केंद्रात व राज्यात येणे आवश्यक असल्याचे मत महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. जयश्री बोरकर यांनी व्यक्त केले. वैनगंगा नदीत जलसमाधीसाठी उतरल्यानंतर आंदोलनकांनी विविध घोषणा दिल्या. यावेळी जि. प. सभापती सभापती शितल राऊत, नरेश ईश्वरकर, जि. प. सदस्य देवा इलमे, स्वाती वाघाये, मनिषा निंबार्ते, सरिता कापसे, विद्या कुंभारे, पूजा हजारे, संगीता नवघरे, नारायण वरठे, रमेश पारधी, प्रेम वनवे, भंडारा शहर अध्यक्ष धनराज साठवणे, काम्युनिष्ट पार्टीचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.









