कुटुंबियांची आमदार बडोलेंनी घेतली सांत्वन भेट मृत्यू झालेल्या जंगली जनावरांच्या हल्ल्यात जखमी

 अजर्ुनी मोरगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मानव व जंगली हिंस्र प्राण्यांमधील संघर्ष तीव्र होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील आदिवासी व नक्षलप्रभावित अतिदुर्गम भागातील नागरिक उपजीविकेसाठी जंगलावर अवलंबून आहेत. मोहफुलाच्या हंगामानंतर सध्या तेंदूपत्ता संकलनाचा रोजगार सुरू असून, याच काळात वाघ, बिबट व अस्वलांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पंधरवड्यात झालेल्या जंगली जनावरांच्या हल्ल्यांत अनेक नागरिक जखमी झाले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

या घटनांची माहिती मिळताच परिसराचे आमदार राजकुमार बडोले यांनी तातडीने १५ मे रोजी संबंधित गावांना भेट देत जखमींची आस्थेने विचारपूस केली तसेच मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी संबंधित कुटुंबांना धीर देत शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. तालुक्यातील बोंडगावसुरबन परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या सुनिता चंद्रकुमार हटवार (वय ४७) यांच्यावर ९ मे रोजी दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. सध्या त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय, अजर्ुनी मोरगाव येथे उपचार सुरू आहेत.

आमदार बडोले यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची विचारपूस केली व उपचारासाठी आर्थिक मदतही केली. तसेच डॉक्टरांना योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. दुसऱ्या घटनेत भरणोली येथील दीपक रतिराम गावळे(वय ४०)हे तेंदूपत्ता संकलनासाठी तिरखुरी सहवन क्षेत्रात गेले असता अस्वलाने त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले.त्यांच्यावरही ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर घरी परतल्यानंतर आमदार बडोले यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रकृतीची विचारपूस केली.जखम गंभीर असल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच वन विभागाकडून तातडीची मदत देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यानंतर वडेगाव-बंध्या येथील कौशल्या राहटे या वृद्ध महिला १० मे रोजी तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेल्या असता वाघाच्या हल्ल्यात जागीच ठार झाल्या. आमदार बडोले यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच केशोरी येथील कुणाल जागेश्वर मेश्राम हा युवक सातारा जिल्ह्यात लाईनमन पदावर कार्यरत असताना त्यांचा १२ मे रोजी संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांचीही आमदार बडोले यांनी भेट घेऊन सांत्वन केले. केशोरी येथील पंढरीनगरमध्ये सदाशिव मडावी यांचे संपूर्ण घर आगीत जळून खाक झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच आर्थिक मदतही करण्यात आली.

याशिवाय, केशोरी येथील लताबाई रामटेके (वय ४२) यांचे २१ एप्रिल रोजी आजाराने निधन झाल्याने त्यांच्या दोन मुली अनाथ झाल्या आहेत. आमदार बडोले यांनी त्यांच्या घरी भेट देऊन शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे व भविष्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार बडोले यांनी ग्रामीण भागातील नागरिक तेंदूपत्ता संकलन व शेतीच्या कामासाठी जंगल परिसरात जात असल्याने वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांची गंभीर दखल घेण्याची गरज व्यक्त केली. नागरिकांच्या जीवित सुरक्षेला प्राधान्य देत वन विभागाने सतर्क राहून गस्त वाढवावी, पिंजरे लावावेत व तातडीची प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. या भेटीदरम्यान गोठणगाव वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गणवीर, जयंत लांजेवार, डॉ. राहुल ठवरे, भोजराम लोगडे, तानेश ताराम, योगेश नाकाडे, राजहंस ढोक, नितीन नाकाडे, नंदकुमार गाहाणे, होमराज पुस्तोळे, विलास बोरकर, संजय खरवडे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *