जन्म, मृत्यू व विवाह प्रमाणपत्रे बारकोड प्रणालीद्वारे द्या -देवश्री कापगते

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली : उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नागरिकांना जन्म, मृत्यू व विवाह नोंद प्रमाणपत्रे दिली जातात. मात्र सदर प्रमाणपत्रे अद्याप ऑनलाईन प्रणालीद्वारे तसेच बारकोडयुक्त स्वरूपात उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळे नागरिकांना विविध शासकीय व वैयक्तिक कामकाजासाठी मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही प्रमाणपत्रे ऑनलाईन व बारकोड प्रणालीद्वारे उपलब्ध करून द्या अशा मागणीचे निवेदन साकोली सेंदूरवाफा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा देवश्री मनिष कापगते यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनात केली आहे.

बारकोड स्वरूपात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयीन प्रवेश, शिष्यवृत्ती, पासपोर्ट तसेच इतर शैक्षणिक कागदपत्रे तयार करताना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच प्रमाणपत्र मृत्यू बारकोडयुक्त नसल्यामुळे संबंधित मृत व्यक्तींच्या नावावरील बँक खात्यांतील रक्कम काढणे, मालमत्ता फेरफार करणे, विमादावे, वारसा नोंदी तसेच विविध कार्यालयीन कामकाजामध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

बहुतांश शासकीय व वित्तीय संस्थांकडून बारकोडयुक्त प्रमाणपत्रांची मागणी केली जाते. याचप्रमाणे विवाह नोंद प्रमाणपत्रे देखील ऑनलाईन व बारकोड प्रणालीद्वारे उपलब्ध नसल्यामुळे नवविवाहित नागरिकांना आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, पासपोर्ट तसेच इतर कागदपत्रांमध्ये नाव बदल व अद्ययावत करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर बाब अत्यंत गंभीर व नागरिकांच्या दैनंदिन हिताशी संबंधित असल्याने नगरपरिषद साकोलीसेंदूरवाफाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे जन्म, मृत्यू व विवाह नोंद प्रमाणपत्रे तात्काळ ऑनलाईन प्रणालीद्वारे व बारकोडयुक्त स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागास आवश्यक निर्देश देण्यात यावेत अशी विनंती या निवेदनातून नगराध्यक्षा देवश्री कापगते यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *