जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने हमाल कामगारांच्या सर्व मागण्या मान्य

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर येथे हमाल कामगारांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर उभारण्यात आलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी तातडीने बैठक घेतली. या बैठकीत हमाल माथाडी कामगार कृती समितीच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य करून त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे स्पष्ट आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. १३ मे रोजी बाजार समितीत झालेल्या बैठकीत काही संचालकांकडून हमाल कामगारांना शिवीगाळ व मारहाणीचा प्रयत्नझाल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत कामगारांनी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला होता.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत संबंधित माथाडी कामगार विभागाचे अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, बाजार समितीचे पदाधिकारी व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत हमालांची अधिकृत नोंदणी, ओळखपत्र व परवाने देणे, हमाली दरवाढ करण्यासाठी पुन्हा एकदा तातडीची बैठक बोलावने, काट्यापर्यंत व काट्यानंतर असे दोन दर पत्रक व्यापारी असोसिएशन व हमाल युनियन यांच्यात करार करून नवीन दर ठरविणे, माथाडी कामगार कायदा जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये लागू करणे, हमाल भवनांची उभारणी, बाजार समितीमध्ये दुसऱ्या नवीन शिव भोजन केंद्राची निर्मिती करणे, सुरक्षा साहित्य व विमा संरक्षण, सेवानिवृत्त हमालांना आर्थिक सहाय्य, अपघाती मृत्यूवर मदत, दिवाळीनिमित्त प्रोत्साहन पर भेटवस्तू किंवा मदत आदी महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. तसेच शेतकऱ्यांसाठी एमएसपीपेक्षा कमी दरात माल खरेदी होऊ नये यासाठी कडक उपाययोजना करण्याचेही आश्वासन देण्यात आले व शेतकऱ्यांसाठी पूर्वी सुरू असलेल्या सर्व योजना नव्याने राबविण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे हमाल कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *