राष्ट्रीय महामार्गावरील जबरीचोरीचा २४ तासांत छडा; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
गोंदिया : -राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशाला अडवून जबरीचोरी करणाऱ्या आंतरराज्यीय आरोपीला अवघ्या २४ तासांत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, गोंदियाला मोठे यश मिळाले आहे.या कारवाईत आरोपीकडून रोख रक्कम, आयफोन आणि दुचाकीसह एकूण २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीविरोधातील दक्षतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सडक अजर्ुनी तालुक्यातील खडकी-बाम्हणी येथील रहिवासी नेकराम लोकचंद शहारे (वय ५७) हे १२ मे रोजी रात्री देवरी आठवडी बाजार करून मोटारसायकलने घरी परततहोते.
दरम्यान, देवरी-कोहमारा राष्ट्रीय महामार्गावरील पुलाजवळ एका अज्ञात इसमाने त्यांची दुचाकी अडवून नगदी तीन हजार रुपये व मोबाईल हिसकावून घेतला.त्यानंतर आरोपीने फिर्यादीला धमकावून गुगल पे ॲपचा पासवर्ड जाणून घेत विविध पेट्रोल पंपांवरून ऑनलाईन व्यवहार करून तब्बल ४९ हजार ८०० रुपये काढले. अशा प्रकारे एकूण ५२ हजार ८०० रुपयांची जबरीचोरी करण्यात आली. या प्रकरणी देवरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक गठित करण्यात आले.
तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीद्वारे आरोपी अयान अब्दुल करिम खान (वय १९, रा. रायपूर, छत्तीसगड) हा नागपूर शहर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून दोन लाखांची रॉयल एनफिल्ड हंटरबर्ड दुचाकी, ३० हजारांची रोख रक्कम आणि ४५ हजारांचा आयफोन जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपीला देवरीपोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत महिला पोलीस उपनिरीक्षक वनीता सायकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.









