बिबट मादी व बछड्यांचे यशस्वी पुनर्मिलन
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा वन विभाग अंतर्गत साकोली वनक्षेत्रातील मौजा सालई येथे मक्याच्या शेतामध्ये बिबट मादीचे दोन बछडे दिनांक १० मे २०२६ ला आढळून आले होते. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागामार्फत तात्काळ कार्यवाही करून दोन्ही बछड्यांची सुटका करून सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आले होते. सानगडी येथील सेवानिवृत्त सुभेदार तेजराम बहेकार यांनी सालई येथील शेतात मक्याची लागवड केली आहे. शेतकरी व मजूर मका तोडणीसाठी शेतात गेले असता त्यांना मक्याच्या पिकामध्ये बिबट्याचे दोन बछडे आढळून आले.
अचानक समोर आलेल्या या प्रकारामुळे शेतकरी व मजूर घाबरून घराकडे परतले. काही वेळानंतर मादी बिबट्याने एका मजुरावर झडप घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सुदैवाने बचावला. घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. मादी बिबट्याच्या वावरामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी शेतात जाणे टाळले आहे. त्यानंतर सदर बछड्यांचे संगोपन व आवश्यक आरोग्य वैद्यकीय तपासणी डॉ. मेघराज तुलावी व डॉक्टर सव्वाशे पशुवैद्यकीय अधिकारी, साकोली यांच्या निगराणीखाली नियमित करण्यात आली. बछड्यांना त्यांच्या मादीशी पुनर्मिलन घडवून आणण्यासाठी शीघ्र बचाव दल भंडारा येथील सदस्य अनिल शेळके, अविनाश नागपुरे, निशी वानखेडे, फगन नेवारे, सुधीर ढेंगे, भूषण मसुरकर, शुभम मोदनकर (जीवशास्त्रज्ञ) तसेच शीघ्र बचाव दल साकोली येथील सर्व सदस्य व वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांच्या देखरेखीखाली योग्य ठिकाणी ठेवण्यात आले होते.
दरम्यान, दिनांक १३ मे २०२५ रोजी रात्री सदर बिबट मादी तिच्या बछड्यांजवळ आली व ती तिच्या दोन्ही बछड्यांना सुरक्षितपणे सोबत घेऊन सुरक्षित स्थळी घेऊन गेली. यामुळे बिबट मादी व तिच्या बछड्यांचे यशस्वी पुनर्मिलन झाले आहे. सदर घटना लाईव्ह कॅमेरा तसेच ट्रॅप कॅमेऱ्यामध्येही स्पष्टपणे दिसून आली. उपवनसंरक्षक योगेंद्रसिंग व साकोली वनसंरक्षक सहाय्यक संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यवाही भंडारा वन विभागामार्फत अत्यंत काळजीपूर्वक व सुरक्षितरीत्या पार पाडण्यात आली. तसेच मादी बिबट्या व बछड्यांवर सतत सनियंत्रण ठेवण्यात येणार असून सध्या साकोली शीघ्र बचाव दल व वन कर्मचारी पूर्णवेळ तैनात असून मादी व मादी बिबट निगराणीत आहेत.









