भरधाव ट्रॅव्हलच्या धडकेत तहसील कार्यालयातील कर्मचारी ठार, एक गंभीर

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली ः- साकोली तालुक्यातील नॅशनल हायवे चारगाव फाट्याजवळ शनिवारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव ट्रॅव्हलरने मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. पोलिसांनी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० मे २०२६ रोजी प्रदीप शेगोजी उके, वय ६० वर्षे, रा. परसोडी व युवराज शिवराम बनकर, वय ५५ वर्षे, रा. परसोडी हे दोघे मोटारसायकलक्र. एमएच ४० एयु ०८९८ ने सातलवाडा येथून बारशाच्या कार्यक्रमाहून परसोडीकडे परत येत होते.

घटनेच्या रात्री चारगाव फाटा परिसरात नॅशनल हायवेवर पाठीमागून येणाऱ्या ट्रॅव्हलर क्र. केअ ०२ एएल८२५७ च्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने, हयगयीने व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रदीप शेगोजी उके यांचा जागीच मृत्यू झाला, तर युवराज शिवराम बनकर हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने साकोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी मृतकाच्या सोबत असलेले जखमी युवराज बनकर यांचा मुलगा राहुल युवराज बनकर, वय २८ वर्षे, रा. परसोडी यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून साकोली पोलिस स्टेशन येथे अप. क्र. ४२७/ २०२६ कलम २८१, १२५(ब), १०६(१) भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम १८४ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रॅव्हलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडूले करीत आहेत. अपघातानंतर ट्रॅव्हलर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *