ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आंदोलनाला खासदाराची भेट, पाठपुराव्याचे आश्वासन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या राज्यव्यापी आवाहनानुसार दि. ११ मे २०२६ ला भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर महाधरणे आंदोलन करण्यात आले. आणि मागण्यांचे निवेदन एका शिष्टमंडळाद्वारे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री व माननीय ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या नावे जिल्हा परिषदेचे अधीक्षक अजय भादुरी यांनी स्वीकारले.

शिष्टमंडळात युनियनचे जिल्हा अध्यक्ष कॉ. माधवराव बांते, कार्याध्यक्ष शिवकुमार गणवीर, जिल्हा सचिव कॉ. हिवराज उके, गजानन लाडसे, संतोष शेंडे, जयप्रकाश मेहर, कृष्णकुमार डहाळे, जयशंकर राऊत, गौरीशंकर धुमनखेडे, जागेश्वर राऊत इत्यादींचा समावेश होता. निवेदनात राज्य शासनाने अभय यावलकर समितीच्या शिफारशी मंजूर करून अंमलबजावणी करावी, किमान वेतन कायद्याप्रमाणे दर पाच वर्षांनी वेतन पुनर्रचना करून वेतन वाढ करण्यात यावी,

वेतनासाठी उत्पन्नाची अट रद्द करून सरसकट शंभर टक्के अनुदान द्यावे, कर्मचाऱ्यांच्या सर्विस बुक अद्यावत करण्यात यावे, अनुकंपा तत्त्वावर मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू करावी आदी मागण्यांचा समावेश करण्यात आला. खा. डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी आंदोलनाला भेट दिली. त्यानी मागण्यांचे समर्थन करून राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. खासदारांना संघटनेतर्फे कॉ. माधवराव बांते, कॉ. शिवकुमार गणवीर व कॉ. हिवराज उके यांच्या हस्ते “शिवाजी कोण होता’ ही पुस्तिका भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सचिव जयप्रकाश मेहर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *