साकोली-सेंदूरवाफा शहरातील अंगणवाड्यांचा होणार कायापालट

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली- सेंदूरवाफा नगर परिषद क्षेत्रातील अंगणवाड्यांच्या विकासासाठी आणि चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी १ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मा. आमदार नाना पटोले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला असून, या कामांच्या नियोजनासाठी नगरसेवक तथा गटनेता इंजि. संदीप बावनकुळे व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी शहरात प्रत्यक्ष मोका चौकशी करून कामाची आखणी केली आहे. शहरातील एकूण १६ अंगणवाड्यांच्या विकासाचे नियोजन या निधीतून करण्यात आले आहे.

नगरसेवक इंजि. संदीप बावनकुळे यांनी केलेल्यातांत्रिक पाहणीत असे दिसून आले की, यातील १३ अंगणवाड्यांच्या इमारती अत्यंत जीर्ण व धोकादायक झाल्या आहेत. चिमुकल्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, या १३ इमारती पाडून त्या ठिकाणी सुसज्ज व आधुनिक इमारतींचे नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. उर्वरित अंगणवाड्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी आणि आवश्यक सुविधा पुरवल्या जाणार आहेत. अनेक वर्षांपासून शहरातील काही अंगणवाड्या छत गळणे, भिंतींना तडे जाणे अशा बिकट अवस्थेत होत्या. या केंद्रांमध्ये सुमारे साडेतीनशे मुले शिक्षण घेत आहेत. आता या नवीन निधीमुळे ३५० मुलांना सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी वातावरणात शिक्षण घेता येणार आहे.

शिक्षण व बालकल्याण क्षेत्रात आमदार नाना पटोले यांनी उचललेल्या यापावलाचे शहरात स्वागत होत आहे. “लहान मुलांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता १३ इमारती तातडीने बदलणे गरजेचे आहे. या अंगणवाड्या आधुनिक आणि सोयीसुविधांनी युक्त कशा होतील, याकडे आमचे विशेष लक्ष आहे,’ असे मत नगरसेवक इंजिनियर संदीप बावनकुळे यांनी पाहणी दरम्यान व्यक्त केले. यावेळी नगर परिषदेचे अधिकारी, तांत्रिक कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विकासकामांमुळे साकोलीसेंदूरवाफा शहराच्या वैभवात भर पडणार असून पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *