तेंदूपत्त्याच्या रानात मृत्यूचा सापळा; वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत
गोंदिया:- गोंदिया जिल्ह्यातील अजर्ुनी मोरगाव तालुका सध्या वाघाच्या दहशतीने अक्षरशः हादरून गेला आहे. जंगलाच्या कुशीत वसलेल्या वडेगाव बंध्या परिसरात रविवारी १० मे रोजी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या एका वृद्ध महिलेवर वाघाने अचानक झडप घालत तिचा जागीच बळी घेतला. जंगलातील शांततेला चिरत आलेल्या या भीषण घटनेने ग्रामस्थांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे. मृत महिलेचे नाव कौशल्या हरिदास रहाटे (वय ६५, रा. वडेगाव बंध्या) असे आहे. त्या वनपरिक्षेत्र गोठणगाव अंतर्गत येणाऱ्या केशोरी वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक २८२ मध्ये आपल्या सुनेसह तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या.
सकाळची वेळ, जंगलातील निवांत वातावरण आणि उदरनिर्वाहासाठी सुरू असलेले रोजचे श्रमःपण नियतीने मात्र वेगळाच डाव आखला होता.दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक कौशल्या रहाटे यांच्यावर झेप घेतली.या अनपेक्षित हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेल्या सुनेने आरडाओरड करत गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, ही घटना घडण्याच्या अवघ्या एक दिवस आधीच बोंडगाव-सुरबन परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. त्या घटनेची भीती अजूनही ग्रामस्थांच्या मनातून गेली नसतानाच सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण अजर्ुनी मोरगाव तालुक्यात दहशतीचे सावट आणखी गडद झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. गावालगतच्या शिवारात कोंबड्या, शेळ्या आणि पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचाही वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक भयभीत झाले असून जंगलात जाणे म्हणजे आता जीव मुठीत घेऊन फिरण्यासारखे झाले आहे.कौशल्या रहाटे या स्थानिक अंगणवाडी केंद्रात मदतनीस म्हणून कार्यरत होत्या. नुकत्याच १ एप्रिल रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या.
आयुष्यभर कष्टाची वाट चाललेल्या या मातेला निवृत्तीनंतर शांत जीवन लाभावे,अशी कुटुंबाची अपेक्षा होती. मात्र गरिबी आणि उदरनिर्वाहाची जबाबदारी यामुळे त्या तेंदूपत्ता संकलनाचे काम करत होत्या. नियतीने मात्र जंगलाच्या वाटेवरच त्यांची जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे गावात शोक आणि हळहळ व्यक्त होत आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वारंवार होणाऱ्या हल्ल्यांनंतरही प्रभावी उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. परिसरात तातडीने पिंजरे लावून वाघाचा बंदोबस्त करावा, जंगल परिसरात वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढवावी, तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या नागरिकांना सुरक्षा द्यावी आणि मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, या सलग घटनांमुळे जंगल आणि मानवी वस्त्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वन्यजीव संवर्धनासोबतच ग्रामीण नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. जंगलाच्या शांत हिरवाईत आता भीतीची सावली दाटून आली असून प्रत्येक पाऊल मृत्यूच्या सापळ्याकडे तर नेत नाही ना, अशी धास्ती ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली आहे.









