दहावी शालांत परीक्षा: जिल्ह्याचा निकाल ८५.७८ टक्के, विभागात पाचवा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला निकालात भंडारा जिल्ह्याची टक्केवारी ८५.७८ असून जिल्हा नागपूर विभागात पाचव्या क्रमांकावर आहे. मागच्या वर्षीपेक्षा जिल्ह्याच्या निकाल अडीच टक्क्यांनी कमी लागला. मागच्या वर्षी निकाल ८८.४८ टक्के लागला होता. निकालात नूतन कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी परत एकदा आपले वर्चस्व कायम ठेवले. या शाळेची अंजली सुनील काळे हिने ५०० पैकी ४९७ गुण प्राप्त करत ९९.४०टक्क्यांसह जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान प्राप्त केला.

वैनगंगा विद्यालय पवनी येथील श्रावणी राजेंद्र ठोंगसे हिने ९७.८० टक्के गुण प्राप्त केले असून जिल्ह्यात दुसरी आणि हयाथसिंग हायस्कूल लाखनीची मेहुल पटले हिने ९७ टक्के गुण प्राप्त करत जिल्ह्यात तिसरी येण्याचा मान मिळिवला. जिल्ह्यातून एकूण १५४६० विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १५३९६ परीक्षेला प्रविष्ट झाले ज्यात एकूण १३२०७ परिक्षार्थी उत्तीर्ण झाले असून २१२३ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर ४०९९ विद्यार्थी प्रथम श्रेणीतउत्तीर्ण झाले आहेत. यंदाही शालांत परीक्षेत मुलींनी बाजी मारली असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी (९१.८४%) मुलांपेक्षा (८०.०९%) अधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *