साकोली तलावाच्या पाळीच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी चा निधी मंजूर

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली:- साकोली शहर व परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून साकोली तलावाच्या पाळीच्या दुरुस्तीसाठी तब्बल ४०१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार नाना पटोले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, आक्रमक भूमिका व प्रभावी नेतृत्वामुळे हा निधी मंजूर झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून साकोली तलावाच्या पाळीला मोठ्या प्रमाणात तडे गेले होते. पावसाळा तोंडावर असताना तलावाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. तलावाच्या पाळीची तातडीने दुरुस्ती न झाल्यास पाणीसाठा हजारो हेक्टर शेतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

हा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन लोकप्रिय विकास आघाडीच्या वतीने गटनेता संदीप वासुदेव बावनकुळे यांच्या नेतृत्वात संबंधित विभागाला निवेदन सादर करण्यात आले होते. निवेदनात सात दिवसांच्या आत निधी उपलब्ध करून तात्काळ काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार नाना पटोले यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळत साकोली तलावाच्या पाळीच्या दुरुस्तीसाठी ४०१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून तलावाच्या पाळीचे मजबुतीकरण, दुरुस्ती व संरक्षणात्मक कामे करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या संपूर्ण पाठपुराव्यात गटनेता संदीप वासुदेव बावनकुळे, नगरसेवक त्रिवेणी चौधरी, नगरसेवक कुणाल राऊत, नगरसेवीका वैशाली लांजेवार, नगरसेवीका डॉ. सायली अतुल दोनोळे, नगरसेवीका निर्मला कुलदीप नंदेश्वर तसेच नगरसेवीका स्मिता सिडाम यांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्व नगरसेवकांनी एकत्र येत साकोलीच्या जनतेच्या हितासाठी लढा उभारल्यामुळे अखेर या महत्त्वपूर्ण कामाला मंजुरी मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, निधी मंजूर झाल्यानंतर साकोली शहर व परिसरातील शेतकरी, नागरिक व विविध सामाजिक संघटनांनी आमदार नाना पटोले यांचे आभार व्यक्त केले लवकरच पावसाळा सुरू होणार असून काम तात्काळ व युद्ध पातळीवर सुरू करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *