सीतासावंगी खून प्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सीतासावंगी येथे जादूटोणा केल्याच्या संशयावरून महादेव शंकर कामथे यांची हत्या करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निमर्ूलन समितीचे पदाधिकारी यांनी सीतासावंगीला प्रत्यक्ष भेट दिली. याप्रकरणी त्वरीत जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत सीतासावंगी येथे दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी जादूटोणाकेल्याच्या संशयावरून महादेव शंकर कामथे (वय ६७) यांची हत्या करण्यात आली.

वृत्तपत्रात प्रकाशित बातमीची सत्यता पडताळणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निमर्ूलन समिती बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, कार्याध्यक्ष प्रा. युवराज खोब्रागडे,चंद्रशेखर भिवगडे, नितेश बोरकर यांनी सीतासावंगी गावात भेट दिली. या प्रकरणात माहिती प्राप्त झाली की, दोन-तीन वर्षापासून या गावातील एका मुलीची तब्येत बरोबर राहत नव्हती. अनेक डॉक्टरांचे उपचार केले तरीसुद्धा तब्येत बरी होत नाही. त्यामुळे महादेव कामथे हाच जादूटोणा करणी करतो असा संशय बळावला आणि त्यातून त्यांचीहत्या करण्यात आली. या नंतर गोबरवाही पोलीस स्टेशन येथे भेट दिली. परंतु या प्रकरणी जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावले नसल्याने पोलीस अधीक्षक नुरुल हसन भंडारा यांना निवेदन देण्यात आले.

सदर प्रकरण अस्तित्वहीन जादूटोणा करणी केल्याच्या कारणावरून खून झाल्याचे दिसून येत असल्याने सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून “महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी, प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा २०१३’ चे कलम ३ (६) वाढवून कारवाई करण्यात यावी व या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *