मुंढरी बु. येथे १३ दिवसांचे आमरण उपोषण मागण्या मान्य झाल्यानंतर मागे

 दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मुंढरी बु. गावाच्या संरक्षणासाठी १३ दिवसांपासून सुरू असले माजी जि. प. सदस्य के. बी. चौरागडे यांचे आमरण उपोषण अखेर मंगळवार, ६ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजता मागे घेण्यात आले. मंडळ अधिकारी संगीता हलमारे यांनी मागण्या मान्य केल्यानंतर माजी आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते मॅंगो ज्यूस पाजून उपोषण सोडवण्यात आले.

मुंढरी बु येथील रेती घाट जिल्हाधिकारी भंडारा यांच्या आदेश क्रमांक १४/खनिज/ अका/कावि-४८/२०२६ नुसार मे. मनोज कुमार अगरवाला यांना देण्यात आला असून त्यांचा ताबा देखील देण्यात आला होता. मात्र या रेती घाटासाठी पूर संरक्षक”टोंड्या’ बांध फोडून रस्ता तयार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. माडगीकडून वाहणारी वैनगंगा नदी मुंढरी बु गावाजवळ ९० अंशाच्या कोनात वळून दक्षिणेकडील प्रवाह पश्चिमेकडे वळतो. वर्षानुवर्षांपासून हा नैसर्गिक “टोंड्या’ बांध मुंढरी बु आणि मुंढरी खुर्द या दोन्ही संवेदनशील गावांचे पुरापासून संरक्षण करत आला आहे. पूर काळात प्रशासनाची दमछाक होत असताना, बांध फोडल्याने संपूर्ण गावाला पुराचा धोका निर्माण झाला होता. गावकऱ्यांनी याला मोवाड गावाप्रमाणे महापुराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. या गंभीर प्रकारासाठी जबाबदार कर्मचारी वघाटधारकांवर कारवाई करावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते. मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने के. बी. चौरागडे २४ एप्रिलपासून मुंढरी बु. ग्रामपंचायतसमोर आमरण उपोषणाला बसले होते. अखेर १३ दिवसांनंतर मंडळ अधिकारी संगीता हलमारे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मागण्या पूर्ण मान्य केल्या. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी ठाणेदार गौरक्षनाथ नागलोत, माजी सरपंच एकनाथ चौरागडे, गंगाधर पासवान, माजी जि.प. सदस्य सरिता चौरागडे, तलाठी वसंता कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *