मतदारसंघात धान, मका आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान चिरडली गोरेगाव-तिरोडा अवकाळीच्या तडाख्याने शेतकऱ्यांची स्वप्ने
गोंदिया :- आभाळातून बरसणारा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी नेहमीच आशेचा दूत मानला जातो. मात्र ऋतूचक्राचा ताळमेळ बिघडला की हाच पाऊस संकटाचे सावट बनून उभा राहतो. गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी (दि. ५) आलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरले. वादळी वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे रब्बी हंगामातील धान, मका आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विशेषतः गोरेगावतिरोडा विधानसभा मतदारसंघाला या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला आहे.
कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील सुमारे १३८९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात गोरेगाव तालुका सर्वाधिक बाधित ठरला आहे. सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. ६) देखील अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नुकसानीचे प्रमाण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शेतात कापणीसाठी तयार उभे असलेले धान वाऱ्यामुळे आडवे झाले असून अनेक ठिकाणी मका पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हंगामाच्या अखेरीस चांगल्या उत्पन्नाची स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा संकटाचे ढग दाटून आले आहेत. दरम्यान, आमदार विजय रहागंडाले यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कटरे, जिल्हा बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे, उपसरपंच कमलेश रहागंडाले तसेच कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेत तत्काळ पंचनामे करून शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. गेल्या खरीप हंगामातही कीडरोग आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या धक्क्यातून सावरण्याआधीच अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकडे आशेने पाहिले होते. ङ्गखरीपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढू,’ या अपेक्षेने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी धानाचीलागवड करण्यात आली होती. यंदा रब्बी धानाचे क्षेत्र तब्बल ७६ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले होते. तर काही शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून सुमारे ७०० हेक्टरवर मक्याची लागवड केली होती. अनुकूल हवामानामुळे धान आणि मका दोन्ही पिके जोमात आली होती.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्साह दिसू लागला होता. काही भागांत मक्याची कापणी आणि मळणी सुरू झाली होती, तर धानपीक काढणीच्या उंबरठ्यावर उभे होते. मात्र अवकाळी पावसाच्या एका झटक्याने या सर्व आशांवर विरजण पडले. शेतात उभे पीक चिखलात लोळताना पाहून अनेक शेतकरी हतबल झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून आले. हवामान विभागाने ४ ते ९ मेदरम्यान जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. मंगळवारी दुपारी हा अंदाज खरा ठरला. गोरेगाव, देवरी आणि गोंदिया तालुक्यात गारपीटही झाली.









