गोंदियातील बिरसी विमानतळ ठरला “शोपीस’ ;”उडान’चे स्वप्न हवेतच विरले

गोंदिया:- कधीकाळी उड्डाणांच्या गजराने दुमदुमणारा बिरसी विमानतळ आज जणू शांततेच्या आवरणात हरवून गेला आहे.सर्वसामान्यांच्या “हवाई प्रवासाच्या स्वप्नांना पंख देणारा हा विमानतळ आता एका आलिशान “शोपीस’ सारखा भासत असून, प्रवाशांच्या अभावामुळे प्रमुख विमान कंपन्यांनी येथे सेवा बंद केल्याने निराशेची छाया दाटली आहे. इंडिगो-स्टार एअरची माघार; उड्डाणे पूर्णतः ठप्प इंडिगो आणि स्टार एअर या नामांकित कंपन्यांनी गोंदियाशी आपला संबंध तोडत सेवा बंद केल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.

इंडिगोची गोंदिया-हैदराबादतिरुपती ही महत्त्वाची उड्डाणसेवा १ मे २०२६ पासून पूर्णतः बंद करण्यात आली.विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीने आपले संपूर्ण सेटअप गुजरातमधील जामनगर येथे स्थलांतरित केले. याच धर्तीवर स्टार एअरनेही २६ एप्रिल २०२६ पासून गोंदियाइंदौर-मुंबई तसेच बेंगळुरू मार्गावरील उड्डाणे स्थगित केली.सुट्टीच्या हंगामात नफ्याच्या मार्गांकडे कंपन्यांचा कल वाढल्याने गोंदियासारख्या लहान शहरांना पुन्हा एकदा उपेक्षेचा सामना करावा लागत आहे. तज्ज्ञांच्या मते, जुलै २०२६ पर्यंत तरी या सेवांच्या पुनरागमनाची शक्यता क्षीण आहे.

“फ्लाय बिग’ पासून इंडिगोपर्यंत; अपयशांची मालिका गोंदियाच्या हवाई प्रवासाचा इतिहास हा आश्वासनांच्या धुसर धुक्यात हरवलेला दिसतो. फ्लायबीग या कंपनीने १३ मार्च २०२२ रोजी “उडान’ योजनेअंतर्गत येथे सेवा सुरू केली होती. उद्घाटनाच्या वेळी मोठमोठी स्वप्ने रंगवली गेली; मात्र २१ ऑगस्ट २०२३ रोजी तांत्रिक अडचणी व नाईट लँडिंगच्या कारणांमुळे फ्लाय बिगनेही काढता पाय घेतला. विशेष म्हणजे, आता बिरसी विमानतळावर अत्याधुनिक उपकरणे, २४ तास नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध असूनही, प्रवाशांचा प्रतिसाद केवळ ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिल्याने कंपन्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला आणि परिणामी त्यांनी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी श्रेय घेणारे आता गप्प.. उड्डाण सेवा सुरू झाल्यावर श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावणारे राजकीय नेते आज मात्र शांततेचा आव आणताना दिसत आहेत.

मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या महानगरांशी थेट हवाई संपर्काचे गोड स्वप्न दाखवले गेले होते; पण आज त्या स्वप्नांचे काचेचे तुकडे वास्तवाच्या पायाखाली खणखणत असल्याचे चित्र आहे. सामान्यांसाठी आकाशमार्ग बंद; “चार्टर्ड’ चाच पर्याय आजच्या घडीला गोंदियातून तातडीने प्रवास करायचा झाल्यास सामान्य नागरिकांसमोर चार्टर्ड विमान किंवा हेलिकॉप्टर हा एकमेव पर्याय उरतो. त्यासाठी लागणारा प्रचंड खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने बिरसी विमानतळ जणू “संपन्नांसाठीच आरक्षित’ झाला आहे. भविष्यातील अनिश्चितता; प्रश्नचिन्ह कायम बिरसी विमानतळाचे भवितव्य सध्या अधांतरी लटकले आहे.

सुविधा असूनही प्रवासी नाहीत, आणि प्रवासी नसल्याने सेवा नाही या दुष्टचक्रात अडकलेल्या या प्रकल्पाला नवसंजीवनी देण्यासाठी ठोस धोरणात्मक पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा, उड्डाणांचे स्वप्न पाहणाऱ्या गोंदियाच्या नागरिकांसाठी हा विमानतळ केवळ आठवणींचा अवशेष बनून राहील असेच चित्र सध्या तरी स्पष्ट दिसत आहे. प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आणि बुकिंग केवळ ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिल्याने विमान कंपन्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत होता. परिणामी, त्यांनी आपली उड्डाण सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे प्रमुख प्रजापती यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *