शिक्षक पदसंख्या शून्य असलेल्या १३ शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्हा परिषद भंडारा येथील माध्यमिक शिक्षण विभागाकडून एक महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला आहे. सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार ज्या शाळांमध्ये मान्य शिक्षक पदसंख्या शून्य (०) झाली आहे, अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या इतर शाळांमध्ये करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांना ० ते ५ किमी अंतराच्या परिसरातील शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील अनेक शाळांचा समावेश करण्यात आला आहे.

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तात्काळ समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. तसेच या प्रक्रियेबाबत संबंधित गटशिक्षणाधिकारी व पंचायत समिती स्तरावर देखरेख ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे शिक्षकविनाचालणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांना पर्यायी शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असली तरी, विद्यार्थ्यांच्या स्थलांतरामुळे काही ठिकाणी पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील शाळा बंद होणार असल्याने भविष्यात मराठीचे शिक्षण घेतो म्हटल्यास गावातील विद्यार्थ्यांना गावातच शिक्षण घेता येणार नाही. त्यांना आर्थिक खर्च सहन करून बाहेरगावी शिक्षण घ्यावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *