अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी ः- भंडारा जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकाने मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करत एकूण ७,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भंडारा पोलीस मोहाडीत येऊन कारवाई करतात तर मोहाडी पोलीस काय करतात असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मोहाडी परिसरात सापळा रचण्यात आला.

दरम्यान, ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे विनापरवाना रेतीची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत एक ट्रॅक्टर(किंमत अंदाजे ६,००,००० रुपये), ट्रॉली (किंमत १,००,००० रुपये) तसेच सुमारे ६,००० रुपयांची रेती असा एकूण ७,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक २२४/२०२६ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पार पडली. पुढील तपास मोहाडी पोलीस स्टेशनकडून सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील अवैध रेती तस्करीवर अंकुश बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *