“त्या” प्रकरणातील सत्य शोधावे; हत्या, घातपात की वन्य प्राणी?
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा ः- पोलीस प्रशासन व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी “त्या’ प्रकरणातील सत्य काय ते शोधावे. अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या महिलेची हत्या, घातपात की वन्य प्राण्यामुळे झाली यावर सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासन व वनविभागाचे अधिकारी आपापली बाजू मांडत आहेत. या प्रकरणातील सत्य काय याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. पोलीस प्रशासन व वनविभागाच्या अधिकाऱ्यावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.
साधना सिताराम उईके (वय ५२) ही १७ एप्रिल रोजी धनेगाव जंगल परिसरात मोहोफुल वेचण्यासाठी गेली असता तिचा मृतदेह जंगल परिसरात १५ फूट खोल खंदकात आढळला. तिची वन्य प्राण्यांनी शिकार केल्याचे सांगितले गेले. तपासाची चक्रे पाहिजे त्या दिशेने न फिरवता वन विभाग व पोलीस प्रशासन उडवा उडविची उत्तरे देउन हवेतच बाण सोडत आहेत. १५ फूट खोल खंदका लगत मोठा झाड असल्याचे व त्या झाडावर बिबट्या शिकार घेऊन चढला असावा आणि चढता चढता बिबट्याच्या जबड्यातून शिकार खंदकात पडली असावी असा तर्क वितर्क लावला जात आहे. तर काही नागरिकांनी घातपात झाल्याची शंका वर्तवली आहे.
या मृत्यू प्रकरणाचा उलगडा होईल त्या दिशेने तपासाची चक्रे फिरविली जात नाही. उच्चस्तरीय चौकशी करून या प्रकरणाचा उलगडा करण्यात यावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. याप्रकरणाचा उलगडा न झाल्यास व एखाद्याची हत्या झाल्यास त्याला वन्य प्राण्यांनी केलेली शिकार तर वन्य प्राण्यांनी शिकार केल्यास तिला हत्येचे स्वरूप देण्यात येईल अशा उलट सुलट चर्चेने परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे. पोलीस प्रशासन हत्या असल्याचा खुलासा करू शकत नाही तर वन विभागाचे अधिकारी वाघ, बिबट्या किंवा इतर वन्य प्राणी असल्याचा दावा करू शकत नाही. तेव्हा या प्रकरणाचा उलगडा कोणी करावा व या प्रकरणाचे रहस्य काय? या प्रकरणात लोकप्रतिनिधी गप्प कां आहेत. उच्चस्तरीय चौकशीची मागणी कां करीत नाही हे न समजण्यासारखे आहे.१५ दिवसाचा कालावधी लोटूनही या प्रकरणाचा उलगडा न होणे यावर संशय व्यक्त होत आहे.









