तुमसर पालिकेत पाणी शुध्दीकरणाच्या नावावर तुरटी घोटाळा?
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- शहरात नळावाटे येणाऱ्या पिवळसर व दूषित पाण्याच्या तक्रारींचा भडका उडालेला असतानाच आता या प्रकरणात धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. पालिकेच्या गोदामात साठवलेली तुरटी ही स्फटिकासारखी नसून मातीच्या विटांसारखी भुसभुशीत व निकृष्ट दर्जाची असल्याचे पाणी पुरवठा सभापती सुनिल डोंगरे यांच्या प्रत्यक्ष पाहणीत उघड झाले आहे. यामुळे केवळ भ्रष्टाचाराचाच नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ केल्याचा गंभीर आरोप प्रशासनावर होत आहे.
गोदामातील साहित्याचे फोटो समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाणारीतुरटी जर अशा दर्जाची असेल, तर नागरिकांच्या घरात पोहोचणारे पाणी किती धोकादायक असेल, याची कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. सध्या नगर परिषदेचा कारभार अक्षरशः “बेपत्ता’ अवस्थेत असल्याचे चित्र आहे.
पूर्णवेळ मुख्याधिकारी सुट्टीवर गेल्यामुळे प्रशासनाचे नियंत्रण सैलावले असून, याचाच फायदा घेत काही कर्मचाऱ्यांनी निकृष्ट साहित्याची खरेदी करून मोठा आर्थिक “खेळ’ केल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांनी या प्रकरणावर कठोर भूमिका घेत स्पष्ट इशारा देत नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. दोषींवर कठोर शिस्तभंगाची कारवाई होईल.व लोकप्रतिनिधींवर खापर फोडण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. पाणीपुरवठा सभापती सुनील डोंगरे यांनी गोदाम पाहणीनंतर संताप व्यक्त करत सांगितले की, साठवलेली तुरटी अत्यंत निकृष्ट दर्जाची असून, ती मातीच्या ढेकळांसारखी आहे. हा जनतेच्या जीवाशी खेळ आहे. संबंधित जवाबदार कर्मचारी सुनील लांजेवार यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.
जिल्हा सहआयुक्त तथा प्रभारी मुख्याधिकारी चंदन पाटील यांनीही चौकशी सुरू असल्याचे सांगत, दोषी कोणीही असो त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र, या सर्व घडामोडींमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. कंत्राटदाराने असा निकृष्ट माल पाठवला तरी तो स्वीकारला कसा गेला? गुणवत्ता तपासणी न करताच देयक मंजूर कोणी केले? मुख्याधिकारी अनुपस्थित असताना हा “घोटाळा’ कोणाच्या आशीर्वादाने झाला?तुमसरच्या नागरिकांचा कररूपी पैसा भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात जात असल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट दिसत आहे. प्रशासन आता दोषींवर खरंच कारवाई करून विश्वास परत मिळवणार की “आपले’ वाचवणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जर तातडीने ठोस कारवाई झाली नाही, तर येत्या काळात तुमसरमध्ये मोठ्या जनआंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना अखेर “कायदा’ धडा शिकवणार का, हा प्रश्न आता सर्वांच्या मनात घोंघावत आहे.गढूळ पाण्यासारखे पालिकेतील राजकारण सुद्धा गढूळ झाले असल्याची चर्चा आहे.









