जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर “मातोश्री पांदन रस्ते’ कामावर भेट

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शेतकरी आणि ग्रामीण विकासाच्या मुख्य आधार असलेल्या पांदन रस्त्याच्या कामांना जिल्ह्यात गती मिळत आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी २३ एप्रिल रोजी मातोश्री पांदन रस्त्याची मौजा डव्वा ता. भंडारा व मौजा पालांदूर ता. लाखनी तालुक्यात प्रत्यक्ष पाहणी केली. मातोश्री पांदन रस्त्यामधून पांदन रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण केले जात असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

भंडारा व लाखनी तालुक्यातील ज्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे अशी सर्व कामे पावसाळ्यापूर्वी भौतिकदृष्ट्या पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनास व सबंधित यंत्रणेनी करावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पावसाळ्यात चिखल आणि खड्यामुळे शेतकरी यांची होणारी ओढतान या कामांमुळे कमी होणार आहे. सदर विषय हा शेतकरी यांचा जिव्हाळ्याचा असून तहसीलदार व यंत्रणेचे अधिकारी यांनी काम सुरु असताना कामावर भेटी देण्याबाबत तसेच कामे टिकाऊ व गुणवत्तापूर्वक होण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.

त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी डव्वा व पालंदूर येथिल शेतकऱ्यांचे या विषयी समाधान आणि मत ऐकून घेतले. तसेच पालंदुर येथील उपस्थित मजुरांशी संवाद साधला. त्यावेळी पाणंद रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण, टिकाऊ होतील व मंजूर कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील याचे नियोजन करावे अशा महत्वपूर्ण सूचना दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे तहसीलदार आणि यंत्रणा यांना निश्चितच प्रेरणा आणि कामाची दिशा मिळून त्यांचा आणि ग्रामस्थांचाही उत्साह वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *