जिल्हा परिषदेच्या शाळेवरील कर रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन
दै. लोकजन वृत्तसेवा साकोलीः- जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयावर लावण्यात आलेला गृह कर त्वरित रद्द करण्यात यावा अन्यथा विद्यार्थ्यासह मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा जि. प. सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष देवा इलमे, नगराध्यक्ष छाया डेकाटेसह ईतर नागरीकांनी मुख्याधिकारी निलेश इंगोले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे. नगरपंचायत मोहाडी तर्फे जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय तसेच बुनियादी व कन्या प्राथमिक शाळा मोहाडी वर गृहकर लादण्यात आला आहे.
नगरपंचायत हद्दीतील नागरिकाकडून नगरपंचायत शिक्षण कर वसूल करते परंतु मोहाडीत जिल्हा परिषदेची शाळा असल्याने नगरपंचायतीची शाळा नाही. शिक्षण करातून या शाळेला एक रुपयाची ही मदत करण्यात येत नाही.
सदर शाळा फार जुनी असल्यामुळे येथील नागरिकांसाठी ही शाळा धार्मिक स्थळापेक्षा कमी नाही. त्यामुळे आज पर्यंत या शाळेवर कोणताही कर लावण्यात आलेला नाही भंडारा येथील लाल बहादुर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाला सुद्धा भंडारा नगरपालिकेकडून कर लावण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेवर लावण्यात आलेला कर रद्द करण्यात यावा अन्यथा या शाळेचे विद्यार्थी मोठा आंदोलन उभारल्या शिवाय राहणार नाही या आशयाचे निवेदन मुख्याधिकारी यांना गुरुवारी देण्यात आले. निवेदन देताना नगराध्यक्षा छाया डेकाटे, भंडारा जिल्हा दुग्ध संघ सदस्य आशिष पात्रे, नगरसेवक तथा शाळा समिती सदस्य महेश निमजे, नगरसेविका अश्विनी डेकाटे, निवृत मुख्याध्यापक उमाशंकर बारई, सिराज शेख आदी उपस्थित होते.









