भंडाऱ्यात पी. एन. जी. पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या भंडारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यात लवकरच पाईप्ड नॅचरल गॅस सेवा सुरू होणार असून, यामुळे घरगुती गॅसवरील खर्चात २० ते २५ टक्क्यांची कपात होणार आहे. सध्याच्या एलपीजी सिलेंडरच्या तुलनेत पीएनजी स्वस्त, पर्यावरणपूरक आणि अधिक सुरक्षित असल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.
अदानी टोटल गॅस लि. या कंपनीमार्फत जिल्ह्यात पीएनजीचे जाळे उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १००० ते १५०० घरांना पीएनजी जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कंपनीचे सहायकव्यवस्थापक बजरंग राठोड यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या माहितीनुसार, तुमसर तालुक्यातील तुडका या गावी कंपनीच्या डेपोचे काम पूर्णत्वास आले आहे. तसेच मोहाडी मार्गेवरठी पर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. घराघरांपर्यंत सुरक्षित पद्धतीने कमी दाबाने गॅस पोहोचवण्यासाठी “डिस्ट्रिक्ट रेग्युलेटिंग स्टेशन’ उभारण्यात येत आहे.
एलपीजीला पर्याय म्हणून पीएनजी गॅस ही काळाची गरज बनली आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होताच हजारोकुटुंबांना याचा थेट लाभ मिळणार आहे. येत्या काळात संपूर्ण जिल्हा पीएनजीच्या जाळ्यात जोडला जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. ज्या भागात पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे, त्या भागातील नागरिकांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला खर्च वाचवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, भंडारा यांनी केले आहे. इच्छुकांनी कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.









