मोबाइल खरेदी करून परतणाऱ्या खैरीच्या तरुणावर काळाचा घाला
दै. लोकजन वृत्तसेवा कोंढा-कोसरा :- मोबाईल आणि सामानाची खरेदी करून मोटारसायकलने गावाकडे परतणाऱ्या दोन तरुणांना विरुद्ध दिशेने आलेल्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यात एक तरुण जागीच ठार झाला. ही घटना कोंढा-अड्याळ मार्गावरील चर्चजवळ सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. प्रफुल्ल सहदेव आकरे (३०) रा. खैरी (तिरर्ी) असे मृताचे नाव असून, मोरेश्वर जीवतू सावरबांधे (३२) रा. अड्ड्याळ हे गंभीर जखमी झालेला तरुण आहेत. प्रफुल्ल आकरे आणि कोंढा येथे नवीन मोबाइल खरेदी तसेच बारदाना खरेदीसाठी गेले होते.
खरेदी करून गावाकडे परत जात असताना, चारचाकी वाहन क्रमांक (एम. एच. २२ यू ३४१४) च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन त्यांच्या चालवून मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत प्रफुल्ल जागीच ठार झाला. मोरेश्वरच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला प्रथम अड्याळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार दिल्यानंतर पुढील उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. अपघात इतका जबरदस्त होता की मोटारसायकलचा चेंदामेंदा झाला आणि चारचाकी वाहन कडेला उतरले. अपघातानंतर चारचाकी वाहन चालक पळून गेला. घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलिसांनी ठाणेदार धनंजय पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मडावी यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी पाहणी केली. तपास पोलीस करीत आहेत.









