भोंदू बाबा खरात हा फडणवीस सरकारचाच तर एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात…… माणूस; हिंमत असेल
गोंदिया :- राज्याच्या राजकारणात सध्या “भोंदू बाबा खरात’ प्रकरणाने धुरळा उडवला असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. फडणवीस सरकार हे या प्रकरणाचा राजकीय हेतूने वापर करत असून, “भोंदू बाबा हा प्रत्यक्षात सरकारचाच माणूस बनला आहे,’ असा घणाघाती आरोप आमदार नाना पटोले यांनी गोंदिया शासकीय विश्राम गृहात रविवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
या प्रसंगी आमदार नाना पटोले यांच्यासोबत खासदार डॉक्टरप्रशांत पडोळे, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड आदी उपस्थित होते. गोंदिया येथे पक्ष संघटनात्मक कामासाठी आलेल्या पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, ज्या प्रकारे नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर आंतरराष्ट्रीय स्तरावर “एफस्टीन फाईल’सारख्या प्रकरणांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात “खरात फाईल’ तयार केली जात आहे.
या कथित फाईलमध्ये सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री आणि आमदारांची नावे समोर येऊ शकतात, असा दावा त्यांनी केला. आ.पटोले पुढे म्हणाले की, “भोंदू बाबा खरात प्रकरणाची चौकशी अनेक दिवसांपासून सुरू आहे, मात्र अद्याप त्याच्या पत्नीला अटक झालेली नाही. तपासाची गती पाहता सरकारची भूमिका संशयास्पद वाटते.’ त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत विचारले की, “आरोपींना अटक न करता इतरांवर आरोप करण्याचा सरकारला अधिकार आहे का?’ यावेळी पटोलेंनी आरोप केला की, या प्रकरणाचा उपयोग करून सत्ताधारी पक्ष आपल्याच नेत्यांना “कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न करत आहे. “फाईल तयार करून दबावाचे राजकारण केले जात आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे,’ असे ते म्हणाले. त्यांनी हेही नमूद केले की, राज्यातील पोलिस यंत्रणा अपेक्षित वेगाने काम करत नसल्याने जनतेमध्ये अविश्वास निर्माण होत आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचाही पटोलेंनी निषेध केला. “राहुल गांधी यांचीलोकप्रियता कमी असल्याचे सांगणाऱ्यांनी एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात. तेव्हा खरी लोकभावना समोर येईल,’ असे आव्हान त्यांनी दिले. निवडणूक प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत, “निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली काम करत आहे,’ माझ्या मते तर निवडणूक आयोग हा सरकारचा चपरासी सारखी भूमिका बजावत आहे अशी टीका केली. याचबरोबर, राज्यभर काँग्रेसकडून महागाई आणि शेतकरी प्रश्नांवर लवकरच तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.









