भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवट; राज ठाकरेंनी मोजक्याच शब्दात सांगितली द लिजेंड आशाताईंची उंची, भावनिक अन् भरीव शब्द

मुंबई:- पद्मविभूषण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे १२ एप्रिल रोजी निधन झाले, वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील श्रद्धांजली वाहत आशाताईंच्या कार्यकतर्ृत्वावर भाष्य केलंय. कला, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आशाताईंना श्रद्धांजली वाहिली. त्यामध्ये, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्यातील कलावंत आणि आशाताईंसोबत असलेल्या जवळीकतेचे पदर आपल्या प्रतिक्रियेतून उलगडले आहेत.

आशाताईंचं जाणं म्हणजे भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक १२ एप्रिल रोजी आपल्यातून गेला, से राज यांनी म्हटले. ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात. लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातलं परफेक्शन, कमालीचा आखीवरेखीवपणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं, असे म्हणत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आशाताईंच्या संघर्षमय जीवनगाथा सांगत त्यांनी कतर्ृत्वातून कमावलेली उंचीही आपल्या शब्दातून व्यक्त केलीय. “गाणं हे माझं पॅशन आहे’ किंवा “ऍक्टिंग माझं पॅशन आहे’ असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात. असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही.

वयाच्या १५ व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण, या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली. मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाजतयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *