भंडारा, जवाहरनगर व तुमसर शहरात शटर फोडणारी टोळी २४ तासात जेरबंद

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा शहर, जवाहरनगर व तुमसर येथे रात्री दुकानाचे शटर फोडणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखा भंडाराच्या पथकाने चोवीस तासात जेरबंद केले आहे. या टोळीने दोन दिवसात ३२ ठिकाणी दुकाने फोडले आहेत. विशेष म्हणजे या टोळीतील सातपैकी चार विधी संघर्ष बालक आहेत. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक नूरूल हसन यांनी आज घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.

नूरूल हसन पुढे म्हणाले, दि. ८ एप्रिल रोजीच्या रात्री भंडारा शहर व जवाहरनगर येथे तर दि. ९ एप्रिल रोजी रात्री तुमसर शहरात दुकानाचे शटर फोडल्याची घटना घडल्या. आपल्या व अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरेयांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर व प्रॉपर्टी पथकातील सहा. पोलीस निरीक्षक नितीन सोनवने, हवालदार प्रदिप डहारे, सतीश देशमुख शिपाई चेतन पोटे, सचिन देशमुख, शुभम ठाकरे, नायक आशिष तिवाडे, शिपाई कौशिक गजभिये यांनी या घटनेचा तपास सुरु केला. तिन्ही शहरातील वेगवेगळ्या घटनास्थळाचे सीसिटीव्ही फुटेज गोळा करून व गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला असता हे आरोपी नागपूर येथील असल्याचे समजले. प्रॉपर्टी पथकाने सतत दोन दिवस आरोपीचा पाठलाग केला.

आरोपी क्र. १ सम्यक उत्तम वाटोळे (वय १८) रा. आंबेडकर नगर, वाडी, नागपूर व अन्य चार विधी संघर्ष बालकांना नागपूर येथे ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी पोलीस स्टेशन भंडारा, जवाहरनगरव तुमसर येथे फरार आरोपी संतोष उर्फ कालु नागदेवे व चिंटु उईके यांच्या सोबतीने रात्र दरम्यान दुकानाचे शेटर तोडून चोरी केल्याचे कबुल केले. आरोपी सम्यक वाटोडे व चार विधी संघर्ष ग्रसत बालकांच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल व चोरी करण्याकरीता वापरण्यात आलेले साहित्य असा एकूण ७९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस टीमला ५० हजार रुपयाचे रिवॉर्ड देण्यात येणार आहे. आरोपीस पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन तुमसर यांच्या ताब्यात देण्यात आले. सदर आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालक यांनी नागपूर शहर, नागपूर ग्रामीण येथे देखील अशा घटना केल्या असल्याची माहिती पोलीस अधिक्षक नूरूल हसन यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *