साकोली येथील एमटीडीसी पर्यटक निवास पर्यटकांसाठी खुले

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- विदर्भातील पर्यटन विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पर्यटकांसाठी साकोली येथे पर्यटक निवास सुरू केले असून, यामुळे विदर्भ पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल, असे एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांनी सांगितले. त्यांनी मुंबईहून आभासी पद्धतीने भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील पर्यटक निवासाचे रीतसर उद्घाटन केले. याप्रसंगी एमटीडीसीच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक दिनेश पाटील साकोली येथेप्रामुख्याने उपस्थित होते.

हे पर्यटक निवास २०१४ पासून १० वर्षांच्या करारावर एका खाजगी संस्थेला चालवण्यासाठी देण्यात आले होते. या काळात या पर्यटन केंद्र मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसायाच्या महापूर आला होता याबाबत बऱ्याच तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या असल्या तरी संबंधित खाजगी व्यवस्थापनावर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याची खंत स्थानिक नागरिकांनी केली आहे. आता जुना करार संपला असल्यामुळे करार संपल्यानंतर, महामंडळाने आता ते स्वतःच चालवण्याचा निर्णय घेतला आहे. “तलावांचा जिल्हा’ म्हणून ओळखला जाणारा भंडारा जिल्हा नैसर्गिक सौंदर्य, वनक्षेत्र आणि धार्मिक स्थळांनी समृद्ध आहे. साकोली येथील हे पर्यटककॉम्प्लेक्स पर्यटकांसाठी आधुनिक सोयीसुविधा पुरवते.

एमटीडीसीच्या वेबसाइटवर आरक्षण उपलब्ध असून, ते १० एप्रिलपासून पर्यटकांसाठी खुले झाले असल्याची माहिती एमटीडीसीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. साकोली येथील पर्यटन निवास खाजगी संस्थेला असल्यामुळे या ठिकाणचे दर सामान्य माणसाला परवडणारे नव्हते. त्यामुळे आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे स्वतः साकोली येथील पर्यटन निवास संचालित करीत असल्यामुळे सामान्य माणसांना परवडणारे दर ठेवण्याची मागणी साकोली येथील निसर्गप्रेमी व पर्यटन प्रेमी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *