भंडाऱ्यात शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हा परिषद येथील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात ८ एप्रिल रोजी विदर्भ माध्यमिक संघाच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस शिक्षक आमदार सुधाकर अडबाले प्रमुख उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आमदार सुधाकर अडबाले यांनी जिल्ह्यातील शिक्षकांच्या अडचणींचा सविस्तर आढावा घेतला. मागील बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या समस्यांवरही सखोल चर्चा करण्यात आली. शासकीय कामकाजातील दिरंगाईवर नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकरणेतात्काळ निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश आमदार अडबाले यांनी दिले.
विशेषतः अनुकंपा तत्वावरील प्रकरणे, चतुर्थ श्रेणी पदांवरील नियुक्त्या, वरिष्ठ व निवडश्रेणी प्रकरणे व अन्य प्रकरणांवर सखोल चर्चा झाली. तसेच प्रलंबित पेन्शन प्रकरणे, टप्पावाढ प्रस्ताव, सेवाजेष्ठता निर्धारण यांसारख्या मुद्द्यांवरही तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्ह्यात एकूण ९९२ थकबाकी देयके प्रलंबित असून त्यापैकी ६९२ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. उर्वरित प्रकरणेही तातडीने निकालीकाढण्याचे निर्देश आमदार अडबाले यांनी दिले. याशिवाय प्रलंबित वैद्यकीय देयके, अर्जित रजा रोखीकरण, भविष्य निर्वाह निधी पावत्या तसेच डीसीपीएस/ एनपीएस संदर्भातील बाबींवरही सविस्तर चर्चा झाली.









