भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ४ तासांत २१ दुकाने फोडली

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यात बुधवार पहाटेची रात्र चोरट्यांसाठी फायद्याची ठरली तर व्यापाऱ्यांसाठी भितीदायक ठरली. भंडारा तालुक्यातील ठाणा, खरबी, शहापूर आणि भंडारा शहरात असे मिळून २१ दुकाने फोडण्यात आली. या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजताच्या सुमारास ही दुकाने फोडण्यात आल्याची माहिती आहे. खरबी येथे तीन, ठाणा येथे तीन तर शहापूर येथे चार दुकाने फोडण्यात आली. त्यातून मुद्देमाल चोरण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहेत.

याशिवाय भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या अर्ध्याकिलोमीटच्या पट्ट्यातील एकूण ११ दुकाने चोरट्यांनी फोडली. साबळ व अन्य अवजारांचा वापर करून शटर वाकविल्याचे प्रत्यक्षरीत्या दिसून आले. विशेष म्हणजे सर्व दुकाने एकाच प्रकारे फोडलेली आहेत. चोरट्यांनी दुकानातील अन्य कोणतेही सामान न चोरता फक्त रोख चोरण्यावरच भर दिल्याचे लक्षातआले. दुकाने फोडल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरताच व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानांकडे धाव घेतली. एकाच रात्री नेहमी वाहतुक असलेल्या या रस्त्यावर एवढी दुकानेफोडण्यात आल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात आहे. पोलिसांनी प्रकरण गंभीरतेने घेतल्याचे दिसून येते. भंडारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार उल्हास भुसार हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्याने शहरासह ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *