उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात दुर्मीळ कृष्णवर्णीय चीतळाचे दर्शन

दै लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- उमरेड-पवनी- करांडला अभयारण्यात वन्यजीवप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सोमवारी (६ एप्रिल) अभयारण्यातील सफारी मार्गावर खापरी तलाव परिसरात दुर्मीळ मेलानिस्टिक (कृष्णवर्णीय) चीतळ आढळून आला. या अनोख्या चीतलाचे दर्शन झाल्याने वन्यजीव अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून अभयारण्याच्या जैवविविधतेत आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण घटकाची भर पडली आहे. पवनी प्रवेशद्वार परिसरात मार्गदर्शक म्हणून कार्यरत असलेले दिनेश डहारे यांनी जंगल सफारीदरम्यान हा कृष्णवर्णीय चीतळ पाहिला. त्यांनी तत्काळ त्याचे छायाचित्र कॅमेऱ्यात टिपले.

ही माहिती वन विभागाला कळिवण्यात आल्यानंतर विभागाने तातडीने त्याची नोंद आपल्या अधिकृत नोंदीत केली आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते मेलानिझम ही आनुवंशिक (जेनेटिक) स्थिती असून त्यामुळे प्राण्यांच्या शरीरात मेलानिन रंगद्रव्याचे प्रमाण अधिक वाढते. परिणामी, चीतलाचा रंग सामान्य चीतळाच्या तुलनेत काळा किंवा गडद दिसतो. चीतळामध्ये अशी रंगवैशिष्ट्ये अत्यंत दुर्मीळ मानली जातात. जंगलात हे प्राणी क्वचितच दिसून येतात. त्यामुळे त्याचे दर्शन होणे हे विशेष मानले जात आहे. उमरेड-पवनीकरांडला अभयारण्य हे घनदाट वनसंपदा आणि विपुल गवताळ प्रदेशासाठी ओळखले जाते. या परिसरामुळे सांबर, चीतल, रानडुक्कर यांसारख्या शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढण्यास पोषक वातावरण निर्माण होते. याच शाकाहारी प्राण्यांवर वाघ आणि बिबट्या यांसारखे मांसाहारी प्राणी अवलंबून असतात. त्यामुळे अभयारण्यातील अन्नसाखळी संतुलित ठेवण्यात या जैवविविधतेचे महत्त्व मोठे आहे. दुर्मीळ कृष्णवर्णीय चीतलाचे छायाचित्र समोर आल्यानंतर वन्यजीवप्रेमींमध्ये चर्चा सुरू झाली असून अभ्यासकांकडून या घटनेचा अधिक सखोल अभ्यास केला जाण्याची शक्यता आहे. भविष्यात अभयारण्यात अशा दुर्मीळ वन्यजीव हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *