तुमसरकरांना मे महिन्यात मिळणार हक्काच्या घरांची भेट
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर शहरातील हजारो नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आणि अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला घरांच्या पट्ट्यांचा प्रश्न आता अखेर निकाली निघाला आहे. येत्या मे महिन्यात शहरातील ५०० हून अधिक पात्र कुटुंबांना त्यांच्या मालकी हक्काचे पट्टे वितरित करण्यात येणार आहेत. आमदार राजू कारेमोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि नवीन शासन निर्णयामुळे हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
मंगळवार, ७ एप्रिल रोजी नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांनी तुमसरचे तहसीलदार उपेश अंबादे यांची भेट घेऊनशहरातील विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी पट्टे वाटप आणि सामाजिक आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शहरातील विविध प्रभागांमध्ये अनेक कुटुंब पिढ्यानपिढ्या वास्तव्यास आहेत, मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्याकडे मालकी हक्क नव्हता.
यामुळे त्यांना घरकुल योजनेचा लाभ घेताना अडचणी येत होत्या. आमदार राजू कारेमोरे यांनी या विषयावर शासन स्तरावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. आतादिनांक २६ मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना मे महिन्यात पट्ट्यांचे वाटप करण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांनी कुंभारे नगर येथील माता रमाई परिसरात बौद्ध भिक्खूंसाठी ‘भिक्षु निवास’ आणि नागरिकांच्या ध्यानधारणेसाठी ‘विपश्यना केंद्र’ उभारण्याकरिता जागा आरक्षित करण्याची नागरिकांनी आग्रही मागणी केली. यामुळे परिसरातील नागरिकांना आध्यात्मिक प्रगतीसाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.









