“एक मुखाने बोला जय जय हनुमान’ जिल्ह्यात गजर!
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यात हनुमान जन्मोत्सव हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. ग्रामीण भागासह शहरातील हनुमान मंदिरात सकाळपासूनच भक्तीची रिघ लागली होती. भजन, कीर्तन, सुंदरकांड, समाज प्रबोधन, आरोग्य शिबिर, सुंदरकांड व जागृती कार्यक्रमाचे आयोजन पार पडले. गाव व शहर भगव्या पताकांनी सजलेले होते.
घरोघरी रांगोळ्या काढण्यात आल्या. मनोभावे पूजा-अर्चना व प्रसादाचे तसेच सायंकाळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भंडारा शहरा सोबतच ग्रामीण भागात विविध वेशभुषा साकारण्या चित्ररथांसोबत शोभायात्रा काढण्यात आली.या कार्यक्रमानिमित्त हिंदू धर्मियांसोबतच विविध धर्माच्या लोकांनी सहभाग घेतल्याने एकतेचे दर्शन दिसून आले. पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता.
हनुमान जन्मोत्सवानिमित्त तुमसर तालुक्यातील प्रसिद्ध चांदपूर येथील हनुमान मंदिरात पूर्व विदर्भातील भाविकांची गर्दी दिसून आली. अड्याळ येथील हनुमान मंदिरात शेकडो भाविकांनी पूजा अर्चना केली. भंडारा शहरातील मोठा बाजार हनुमान मंदिरात भाविक श्रद्धेने नतमस्तक झाले. हनुमान भक्तांनी बजरंगबलीच्या चरणी नतमस्तकहोत “जय जय बजरंगबली, एक मुखाने बोला जय जय हनुमान’ अशा गगनभेदी घोषणा दिल्या. गावागावात टाळ व मृदंगाच्या गजरात तर डिजे व ढोलताशांच्या निनादात शोभायात्रा काढून भक्तीमय वातावरणाची निर्मिती केली. अनेक ठिकाणी रात्री जगरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.









