नरभक्षक वाघाचा महिलेवर पुन्हा हल्ला

 दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- तालुक्यात नरभक्षक वाघाच्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून १२ दिवसांत तिसऱ्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण अधिकच तीव्र झाले आहे. लाखनी वनपरिक्षेत्रातील आमगाव खुर्द येथे १ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास शेतात काम करत असताना छाया सुधाकर मुंगमोडे (वय ४३) यांच्यावर वाघाने अचानक हल्ला चढवून गंभीर जखमी केले. सध्या त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार, छाया मुंगमोडे या सकाळी शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घातली.

स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी महिलेला साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. १९ मार्च रोजी बांपेवाडा येथील वसंता मेश्राम (वय ५०) यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर २८ मार्च रोजी उमरझरी येथील माया रामकृष्ण सोनवणे (वय ४८) या महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. आता पुन्हा आमगाव खुर्द येथे झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीसोबतच संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी प्रयत्न तीव्र केले आहेत. परिसरात पिंजरे लावण्यात आले असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. तसेच रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली आहे.

वाघ दिसताच ट्रॅन्क्विलायझरच्या सहाय्याने पकडण्याचे आदेश देण्यात आले असून ड्रोन व तात्पुरत्या टॉवरच्या माध्यमातून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. तरीदेखील वाघ अद्याप वनविभागाच्या हाती लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, २८ मार्च रोजी संतप्त ग्रामस्थांनी साकोली-तिरो़डा मार्ग रोखून आंदोलन केले होते. आठ दिवसांत वाघाला पकडण्यात यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता. सततच्या हल्ल्यांमुळे जंगलालगतच्या शेतांमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *