अंगणातून बेपत्ता झालेल्या दोन चिमुकल्यांचा मृतदेह पाण्याच्या डबक्यात सापडले
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- अंगणात खेळत असताना गायब झालेल्या दोन चिमुकल्यांचा पाण्याच्या डबक्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तुमसर तालुक्यातील रोंगा गावात आज दि. १ एप्रिल रोजी उघडकीस आली. मृतक बालकाचे नाव चंदपाल रूपचंद कुंभरे (वय ७( व सार्थक संजय उईके (वय ६) असे आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. रोंगा येथील चंदपाल रूपचंद कुंभरे आणि सार्थक संजय उईके हे दोघे मंगळवार दि. ३१ मार्च रोजी संध्याकाळी सुमारे चार वाजेपर्यंत आपल्या घरासमोर अंगणात खेळत होते. त्यानंतर ते अचानक बेपत्ता झाले. बराचवेळ लोटल्यानंतरही दोघे घरी परत न आल्याने कुटुंबियांनी शोध घेण्यास सुरुवात केली.
कुटुबियांसह गावकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत गाव परिसर, शेतजमिनी आणि आसपासच्या भागात शोधमोहीम राबविली. मात्र त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे कुटुंबियांची चिंता अधिकच वाढली होती. दरम्यान आज दि. १ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास गावाजवळील एका पाण्याच्या डबक्यात दोन लहान मुलांचे मृतदेह तरंगतांना काही नागरिकांच्या लक्षात आले.त्यांनी तात्काळ ही माहिती गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी हे ऐकून घटनास्थळी गर्दी केली. नंतर मृतदेहांची ओळख चंदपाल कुंभरे आणि सार्थक उईके अशी पटली. ही बातमी समजताच दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. संपूर्ण गावात शोकमय वातावरण आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार ही घटना अपघाती बुडण्याची असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.









